मुंबई : मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आलीे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली.
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत. तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे.
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ््या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणा-या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही, अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते.