अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली असून कलशयात्रा राम मंदिरात पोहोचली आहे. त्यामुळे आता रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंबंधित वेगवेगळ््या विधींना सुरुवात करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी देशभरातील ऋषी-मुनींना आमंत्रित करण्यात आले आहे.
अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला नव्याने बांधलेल्या मंदिरात प्रवेश करणार आहेत. रामजन्मभूमी संकुलाचा फेरफटका मारत रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्यात येणार आहे. त्यासाठी शरयू नदीच्या पाण्याने गर्भगृह शुद्ध करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. ५ वर्षांच्या रामलल्लाच्या बालस्वरूपातील या पुतळ््यात ते कमळाच्या फुलावर उभे असलेले दिसतील आणि त्यांच्या हातात धनुष्यबाणही असेल.
प्राणप्रतिष्ठा आदरणीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.