नवी दिल्ली : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचे वैवाहिक आयुष्य ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या गेल्या वर्षभरापासून येत होत्या, मात्र आतापर्यंत दोघांनीही या बातम्यांवर मौन बाळगले आहे. सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवरून शोएब मलिकचे सर्व फोटो डिलीट केल्यानंतर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी सुरू झाल्या. त्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्टही शेअर केली.
त्यामुळे ती आणि शोएब वेगळे होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच आता सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न आणि घटस्फोटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्न कठीण असते, घटस्फोटही कठीण असतो’ अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली असून त्यावरून पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न, घटस्फोट याच्याशी संबधित एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्न किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच, तुम्हाला काय कठीण वाटत आहे ते निवडा. जाड राहणंही कठीण आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. कर्जात बुडणे कठीण आहे, आर्थिक शिस्त लावणेही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटते ते निवडा. बोलणे कठीण आहे आणि मौन बाळगणेही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. आयुष्य कधीही सोपं नसतं ते कठीणच असतं. आपण ते आपल्या मेहनतीने निवडतो. त्यामुळे विचार करा आणि मगच निवड करा.’ अशी पोस्ट सानियाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.