लखीमपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज सहावा दिवस आहे, सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे. मणिपूर, नागालँडसह आसामच्या अनेक भागांमधून राहुल गांधी प्रवास करत आहेत. यादरम्यान आसाममध्ये भाजपच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला करून बॅनर्स फाडले, गाड्यांची तोडफोड केली असा आरोप कॉँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. यामध्ये पटोले यांनी सांगितले की, काल आसाममध्ये भाजपाई गुंडांकडून भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स, गाड्यांच्या ताफ्याची तोडफोड करण्यात आली, त्यांना एकच सांगणे आहे, तुम्ही कितीही द्वेष करा, आम्ही प्रेमाने, लोकशाही मार्गानेच पुढे जाऊ, हा भारताचा प्रवास आहे, अन्यायाविरुद्ध न्यायाचा प्रवास आहे, ‘भारत जोडो न्याय यात्रा’ कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही! असे पटोले म्हणाले.
काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. यासोबत आसामच्या लखीमपूर येथे भारत जोडो यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. या प्रकारामुळे भारत जोडो यात्रेला मिळत असलेलं प्रेम आणि समर्थन पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.