सेलू : गुणवंत विद्यार्थी म्हणजे आमची हि-याची खान आहे. या खाणीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवंता प्राप्त झालेल्या विद्यार्थी कोहिनूर हिरा आहेत. तेजश्रीचे तेज व प्रेरणांची प्रेरणा घेऊन असे अनेक विद्यार्थी या शाळेत घडावे. विद्यार्थ्यांनी नुसती घोकमपट्टी न करता त्यांनी शिक्षणाचे ज्ञानार्जन करावे असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.संजय रोडगे यांनी केले.
श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ. अपूर्वा पारवे (रोडगे), मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. रोडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
गुणवंत सत्कारामध्ये ऑलम्पिक परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आयएमओमध्ये १ ला क्रमांक प्रेरणा कास्टे, ८ वा क्रमांक प्रज्वल रोडगे, ९वा क्रमांक तेजश्री चौधरी, एनएसओमध्ये १२ वा क्रमांक प्रज्वल रोडगे, एनएसओमध्ये २९ वाद क्रमांक तेजश्री चौधरी, आयएमओमध्ये ४५ क्रमांक उन्नती राठी, आयईओमध्ये ६३ वा क्रमांक प्रेरणा काष्टे, एनएसओमध्ये ६३ वा क्रमांक श्रीयश पोटदार यासोबत दुस-या स्तरावर परीक्षेत गेलेले विद्यार्थी व सुवर्णपदक मिळालेले २२ विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकासोबत केला.
भूषण कासट, डॉ. नंद, कास्टे इत्यादी पालकांनी चिमुकल्या मुलांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष व शिक्षक वर्गांचे कौतुक केले. या सत्कारामुळे मुलांचे मनोबल वाढले जाते, त्यांना प्रेरणा मिळते. पुढे चालून हे विद्यार्थी चांगल्या पदावर जावे अशी आशा व्यक्त केली. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना बाबट यांनी केले.