21.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘ईडी, सीबीआय ’ सुसाट

महाराष्ट्रात ‘ईडी, सीबीआय ’ सुसाट

 विरोधी ठाकरे अन् शरद पवार गट टार्गेट!

मुंबई : देशातील विरोधी पक्षांची सरकारे तसेच नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्येसुद्धा गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आत्तापासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे का? अशी शंका यावी इतक्या वेगाने कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानक वाढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष्य ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील नेते आहेत.

अजित पवार सत्तेत सामील होण्यापूर्वी त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार तसेच चौकशी सुरू असताना त्या चौकशीचे आणि होणा-या गंभीर आरोपांचे काय झाले? हा विरोधकांचा प्रश्न अनुत्तरित असतानाच आता शरद पवार गटातील आणि ठाकरे गटातील उर्वरित नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू झाला आहे.

१९ जानेवारी या एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनासुद्धा बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस आल्याने भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधी ठाकरे-शरद पवार गटाचा संघर्ष टोकाला गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी अक्षरश: सरकारला प्रत्येक मुद्यावर धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार आदित्य ठाकरे सुद्धा प्रत्येक मुद्यांवर शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. दावोस दौ-यावर त्यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सरकारला सावध भूमिका घ्यावी लागली. आमदार रोहित पवार यांनी सुद्धा राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढत सरकारला धारेवर धरले आहे.

महापत्रकार परिषदेनंतर कारवाईला वेग?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निवाडा करताना शिवसेना शिंदेंना दिली , पण आमदार सुद्धा दोन्ही गटातील पात्र केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानंतर जनता न्यायालय भरवत राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करत निवडणूक आयोगाला सुद्धा आरोपाच्या पिंज-यात उभे केले. १६ जानेवारी रोजी जनता न्यायालयात चिरफाड झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत चार नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यामध्ये सुजित चव्हाणांवर अटकेची कारवाई झाली आहे. आमदार राजन साळवी यांनाही कधीही अटक होऊ शकते, असे बोलले जात आहे.

सुजित चव्हाणांवर ईडीकडून अटकेची कारवाई
किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना २५ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आणखी एक नेते आणि आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या समजले जाणा-या सुजित चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे. हे तीन नेते ईडीच्या रडारवर असतानाच लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात सुद्धा अँटीकरप्शन ब्यूरोकडून कारवाईचा ससेमिरा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR