परभणी : देशात ज्या काही महत्त्वपूर्ण व आवश्यक बाबी आहेत. त्यात प्रत्येक नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच माणसाच्या जीवनात आरोग्य ही बाब महत्वपूर्ण आहे. प्रत्येक माणसाने आरोग्याकडे सजगपणे पाहणे व काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हाच माणूस निरोगी जीवन जगू शकतो. माणसाच्या आयुष्यात इतर संपत्ती पेक्षा आरोग्य ही संपत्ती लाख मोलाची व सर्वश्रेष्ठ अशी संपत्ती आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजश्री शाहू महाविद्यालय परभणी यांच्या विद्यमाने ब्राह्मणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या ७ दिवशीय विशेष वार्षिक युवक शिबिराच्या ५व्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच दगडू अण्णा काळदाते तर प्रमुख उपस्थिती म्हणून दिगंबर नाईक, डॉ.कल्याण गोपनर यांची उपस्थिती होती.
आरोग्य तपासणी शिबिरात श्री सत्यसाई सेवा समिती परभणी द्वारा नेत्ररोग तज्ञ डॉ.विजयसाई शेळके, डॉ.अरुण लांडे, डॉ. श्रद्धा रेनगडे, बाबुराव आळसे, नंदकुमार टाक, ज्ञानेश्वर महाजन, रवी महाजन आदी तज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांचे १०० रुग्णाची तपासणी केली. या शिबिराचा गावातील सर्व लहान मुले, ग्रामस्थांनी लाभ घेतला. प्रास्ताविक डॉ.कल्याण गोपनर यांनी तर सूत्रसंचालन विष्णू विधाटे यांनी तर आभार शोभा डोंगरे यांनी मानले.