मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणा-या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्व्हेविषयी कळू द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असून प्रशासनानेही पूर्ण शक्ती एकवटून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त उपस्थित होते. निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव कलोते यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
या वेळी गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाखपेक्षा जास्त प्रगणक ८ दिवसांत हे काम पूर्ण करणार आहेत, असे ते म्हणाले. ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रांत प्रशिक्षण आजपासून सुरू झाले आहे.
३१ जानेवारीपर्यंत चालणार सर्वेक्षण
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रितीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. या कामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे. हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या, ग्रामपंचायतीच्या फलकांवर सूचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना या विषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणा-या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे बिनचूक सर्व्हेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
१ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे संबंधिताना वितरीत केले आहेत. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या. संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे, अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली.
न्या. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती
कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्त्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या तसेच पोलिस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा, असे मुख्यमंत्री म्हणाले.