चेन्नई : श्रीराम जन्मभुमी अयोध्येत होणा-या भव्य सोहळ्याची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट प्रक्षेपीत केल्या जाणार आहे. पण, या मुद्यावरुन राजकारणही तीव्र झाले आहे. विरोधकांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप केला आहे. तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत सीतारामन यांनी लिहिले की, तामिळनाडू सरकारने २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये श्रीरामाची २०० हून अधिक मंदिरे आहेत. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग द्वारे व्यवस्थापन होणा-या या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसाद वाटप/अन्नदानाला परवानगी नाही. खासगी मंदिरांनाही कार्यक्रम आयोजित करण्यापासून पोलिस रोखत आहेत. मंडप पाडू, अशी धमकी आयोजकांना देत आहेत. या हिंदूद्वेषी, घृणास्पद कृतीचा मी तीव्र निषेध करते.
त्या पुढे म्हणतात, ‘तामिळनाडूच्या अनेक भागातून धक्कादायक दृश्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना भजन आयोजित करण्यापासून, गरिबांना जेवण देण्यापासून, मिठाई वाटण्यापासून, उत्सव करण्यापासून रोखले जात आहे आणि धमकावले जात आहे. अनेकांना पंतप्रधान मोदींना आणि अयोध्येतील सोहळ्याला पाहायचे आहे. पण, लाइव्ह टेलिकास्टदरम्यान वीज खंडित होण्याची शक्यता असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सना सांगण्यात आले आहे. तामिळनाडू सरकार थेट प्रसारण बंदीचे समर्थन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहे. ही साफ खोटे आहे. अयोध्या निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली, त्या दिवशीही ही समस्या उद्धभवली नाही. तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामाचा अभिषेक उत्सव साजरा करण्यासाठी लोकांमध्ये जो उत्साह संचारला आहे, त्यामुळे हिंदुद्वेषी द्रमुक सरकार प्रचंड अस्वस्थ झाले आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.