उदगीर : प्रतिनिधी
आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची उभारणी झाल्यानंतर आज रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याने संपूर्ण भारतभर रामनामाचा गजर सुरू आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाई वनवासात असताना ते काही दिवस हत्तीबेटावर वास्तव्यास असल्याच्या पाऊलखुणा आजही उदगीर तालुक्यातील हत्तीबेटावर व औसा तालुक्यातील खरोसा गडावर पाहावयास मिळतात. प्रभू रामाच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत या निमित्ताने हत्तीबेटावर साफसफाई, विद्युत रोषणाई, भगवे ध्वज व ११ हजार दिवे लावण्याचे काम साधकांकडून सुरू आहे.
अयोध्येचा राजा दशरथ यांनी आपल्या पत्नीला दिलेले वचन पाळण्यासाठी आपला पुत्र प्रभू श्री रामचंद्रांना चौदा वर्षे वनवासाला धाडले. प्रभू श्रीरामचंद्रासोबत बंधू लक्ष्मण व पत्नी सीतामाईसुद्धा वनवासाला निघाले. प्रभू श्रीरामचंद्र दंडकारण्यातून जात असताना त्यांची अनेक तपस्वी साधू व ऋषिमुनींची भेट झाली. त्या काळात ऋषिमुनींच्या तपश्चर्येत राक्षसांचा उपद्रव होत असे. ऋषिमुनींच्या जप, तप साधनेत राक्षसांची विघ्ने मोठ्या प्रमाणात होती. त्या राक्षसांचा बंदोबस्त व नायनाट करण्याची मागणी ऋषिमुनींनी प्रभू रामचंद्रांकडे केली. हत्तीबेटावर असलेल्या गुहेत ऋषिमुनींची आपली जपतप साधना सुरू होती. या ठिकाणी ऋषिमुनींना पिण्याचे पाणीही नव्हते. प्रभू रामचंद्रांनी हत्तीबेटाच्या पश्चिमेकडील बाजूस आपल्याजवळ असलेला बाण मारून या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय केली. आजही हा चलम्यातील पाण्याचा झरा बारमाही वाहतो.
हत्तीबेटावर व्याघ्र गुहेच्यावर रामलेणी आहे. या रामलेणीच्या बाजूलाच सीतेचे स्रानगृह आहे. प्रभू रामचंद्रांनी देवर्जनच्या देव नदीकाठी व हत्तीबेटावर व जवळच जवळगा येथील मांजरा नदीच्या पात्रात शिवलिंग व रामलिंग स्थापन करून पूजन केलेले अवशेष आजही पाहावयास मिळतात. तेथून प्रभू रामचंद्रांनी खरोसागडावर जाऊन तेथील ‘खर’ नावाच्या राक्षसास ठार केल्याची आख्यायिका आहे.