लातूर : प्रतिनिधी
येथील एका खाजगी शिकवणी चालकाने शिकवणीसाठी आलेल्या दहावीतील अल्पवयीन मुलीला वाईट हेतुने आतील खोलीत नेत, तिचा हात पकडून, अश्लिल चाळे करीत तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्या नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी शिकवणी चालक आरोपी सागर मांडे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरातील खाजगी ट्यूशनमधील सागर मांडे याचे शिकवणी वर्ग चालतात. त्याच्याकडे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकवणीसाठी येतात. गुरूवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास आरोपी शिकवणी चालक सागर मांडे हा त्याच्या शिकवणी वर्गात होता. त्याने जाणीवपूर्वक शिकवणीला आलेल्या दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीला एकटीला थांबविले. सदर पीडितेने मला का थांबविले, असे विचारताच मांडे याने तिला पाणी आणण्यास नांगितले. मुलीने त्याला पाणी आणून देताच वाईट हेतुने मांडे याने विद्यार्थिनीचा हात धरला. तिला आतील खोलीत घेऊन गेला.
यामुळे पीडित विद्यार्थिनी गांगारून गेली. त्याचवेळी मांडे याने आतील खोलीच्या दरवाजाची कडी लावून घेत विद्यार्थिनीशी वाईट उद्देशाने तिला स्पर्श केला. तिच्यासोबत झोंबाझोंबी करू लागला. पीडित मुलीने रडण्यास सुरूवात केली, कसेबसे त्याच्या तावडीतून सुटून दरवाजाची कडी घडून शिकवणी वर्गात आली. त्यावेळी मांडेही तिच्या भागे वर्गात आला. त्याने रडत असलेल्या विद्यार्थिनीला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर ‘तुझ्यासह माझ्याकडे शिकवणीला असलेल्या तुझ्या लहान भावाला जीवे मारून टाकतो’, अशी धमकी दिली.