सोलापूर: अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात रे नगर योजनेच्या घरांचा ताबा असंघटित कामगारांना देण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा प्रभाव दिसून आला.पण याच वातावरणनिर्मितीला जोडून शहर व जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी झाडू हाती घेऊन अनेक मंदिरांच्या परिसरात साफसफाईसाठी पुढे सरसावले.या उपक्रमातून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न होताना दिसून आले.
पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी सर्व मंदिरांमध्ये साफसफाई करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी मंदिरांच्या परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.शहरातील बाळे येथे प्रसिध्द खंडोबा मंदिराच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार विजय देशमुख आले होते. हाती झाडू घेऊन त्यांनी साफसफाईला सुरूवात करताच त्या कामासाठी इतर कार्यकर्त्यांचे हात लागले. तर अकलूजमध्ये ग्रामदैवत श्री अकलाई मंदिराची परिसर स्वच्छता आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सपत्नीक केली. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
करमाळा येथे मंदिरांमधील साफसफाईसह प्रमुख रस्त्यांवर भगवे पताके लावण्यात येत असून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या स्वागतासाठी डिजिटल फलकांचीही उभारणी केली जात आहे. तेथील वेताळ पेठेत श्रीराम मंदिरात राम,सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होत आहे.शहरातील पूर्व भागात श्रीराम मंदिरासह नव्या पेठेतील नवे राम मंदिर, दक्षिण कसब्यातील जुने राम मंदिर, लष्कर भागातील राम मंदिर यांसह अनेक देवदेवतांच्या मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. अनेक रस्त्यांवर डिजिटल फलकांवर प्रभू श्रीरामाच्या प्रतिमांचे दर्शन घडविले जात आहे. शालेय मुलांची रामफेरीही काढली जात आहे.