नाशिक : सत्तेत येण्याआधी मोदी सरकारने दोन वर्षांत दोन कोटी रोजगार देण्याची केलेली घोषणा हवेत विरली असून नोकरी मिळणे तर सोडाच पण आहे तो रोजगार टिकवणे अवघड झाले असून गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी अधिक वाढल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी मंत्री अरविंद सावंत यांनी केला.
नाशिकमध्ये आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आणलेले कायदे कामगारांना देशोधडीला लावणारे आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी देशात आंदोलन सुरू आहे परंतु या नोक-या आहेत कुठे असा प्रश्न विचारून गेल्या ७५ वर्षांत उभारण्यात आलेले सार्वजनिक उद्योग विकण्याचे काम सुरू असल्यामुळे आरक्षण मिळाले तरी नोक-या मिळतील का असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.
राज्यात आघाडीचे सरकार होते तेव्हा आम्ही नव्या कामगार कायद्याला विरोध केला होता. त्यानंतर सत्तापालट झाला आणि भाजपने तो कायदा आणला. आता त्याविरोधात लढा उभारून हा कायदा मागे घ्यायला भाजपला भाग पाडू असेही ते म्हणाले. कंपनी कायदा प्राधिकरण सेटलमेंट करताना कामगारांवर अन्याय करते आणि अनिल अंबानीसारख्या उद्योजकांना मोठी सवलत देते. बँका त्याला मान्यता देतात मात्र थोड्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा बँका असे निर्णय का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.