22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमहाडमधील कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

महाडमधील कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

रायगड : महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती. या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे ११ कामगार अडकले होते. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे कामगार कंपनीत अडकले होते, त्यापैकी ९ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ७ तर शनिवारी सकाळी २ मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या स्फोटाची भीषणता पाहून कालच एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, काल सकाळी स्फोटानंतर कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने एनडीआरएफ पथक बोलावण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने रात्री ११.३० च्या सुमारास कंपनीत ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी त्यांना आधी ४ मृतदेह सापडले. नंतर एक एक करुन आणखी ३ मृतदेह हाती लागले. त्यानंतर शनिवारी आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आल्याने, ११ पैकी ९ कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख, अशी एकूण ४५ लाखांपर्यत मदत मिळवून देऊ, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR