उंब्रज : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, पिवळाधमक भंडारा व खोब-याच्या तुकड्यांची उधळण करत लाखो व-हाडी मंडळींच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. क-हाड तालुक्यातील पाल येथे गोरजमुहूर्तावर हा सोहळा पार पडला. पिवळ्याधमक भंडा-याची उधळण, सूर्यास्ताची किरणे यामुळे विवाहाच्या बोहल्यासह संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र दिसत होते.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो व-हाडी भाविक सोमवारी पाल येथे दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.
देवळात आरती झाल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून ते रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. ही शाही मिरवणूक तारळी नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोहोचली. त्यानंतर व-हाडी मंडळींचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला.