कौसडी : आजच्या काळात आपण कामाच्या व्यापामुळे व्यस्त झालो आहेत. त्यामुळे आपण परमार्थ करण्यासाठी वेळ देत नाहीत. त्यामुळे आपल्या मनात अनेक विचार येत आहेत. हे विचार नष्ट करण्यासाठी सुखी जीवन जगण्याचा मार्ग फक्त परमार्थ मध्येच आहे. यासाठी प्रत्येकाने परमार्थ केल्याशिवाय दिवस घालू नये असे प्रतिपादन हभप अंकुश महाराज साखरे यांनी केले.
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे तरुण मित्रमंडळाच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेला दि.१६ पासून प्रारंभ झाला होता. यावेळी साखरे महाराज पुढे बोलताना म्हणाले की, आज पूर्ण देशामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त अनेक उत्सव कार्यक्रम साजरे होत आहेत. या कार्यक्रमात कौसडी येथील तरुण मित्रमंडळीने हा जो कार्यक्रम घेतला याबद्दल त्यांनी तरुणाचे कौतुक केले. दि.२२ रोजी श्रीराम मुर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ढोल ताशा, टाळ मृदंग व झांज पथक सहभागी झाले होते. या सप्ताहाची सांगता दि.२३ जानेवारी रोजी ह भ प अंकुश महाराज साखरे यांच्या काल्याचे कीर्तनाने झाली. यावेळी बोरी, कौसडी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.