नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्रात ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आसाममध्ये आवश्यक ती सुरक्षा दिली जात नाही आणि भाजपचे कार्यकर्ते यात्रेवर हल्ले करत आहेत. असे करणाऱ्यांना आसाम पोलिस संरक्षण देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात खरगे यांनी लिहिले की, २१ जानेवारी रोजी सोनितपूर जिल्ह्यात यात्रेवर हल्ला झाला. जे स्थानिक एसपी होते ते राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे भाऊ होते, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, तर या लोकांनी आमचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. आसाम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात ते जखमी झाले. दुसऱ्या दिवशी २२ जानेवारीला भाजप कार्यकर्त्यांनी नागाव जिल्ह्यात राहुल गांधींचा ताफा अडवला आणि त्यांच्या अगदी जवळ आले होते. या सर्व त्रासदायक घटनांदरम्यान, आसाम पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांचे संरक्षण सुरूच ठेवले. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन खर्गे यांनी केले.
मंगळवारी यात्रेला गुवाहाटीला जाण्यापासून रोखण्यात आले तेव्हा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आसाम पोलिसांनी राहुल गांधींविरोधात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.