27.7 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ८१९ रुग्णवाहिका वाढणार

राज्यात ८१९ रुग्णवाहिका वाढणार

नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश

अकोला : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.

गेल्या १० वर्षांत राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला. समुद्र व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणा-या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्रकिनारे व नदीपात्रांमध्ये तैनात होणार आहेत. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत.

दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नवीन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणा-या संस्थेला करावा लागेल. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. रुग्णवाहिकांसाठी सद्यस्थितीत प्रतिमहिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतात. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रति महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतील. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रति महिना शासनाला खर्च करावा लागणार आहे. रुग्णवाहिकांची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होईल.

रुग्णवाहिकांची संख्या
सध्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये २३३ ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, ३३ दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. नव्यामध्ये २२ ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ५७० ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, दुचाकी रुग्णवाहिका १६३, २५ नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका आणि ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका वाढणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR