नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रथम, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवू शकतो, असे म्हटले. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पार्टी, टीएमसी हे आघाडीचे भाग आहेत. पण आप पंजाबमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार असे सांगितले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
ममता म्हणाल्या की, सध्या राहुल गांधींची यात्रा सुरु आहे. यात्रा बंगालमध्ये सुद्धा येणार आहे, पण आम्ही बंगालमध्ये येत आहोत, याची कल्पना अद्याप त्यांनी आम्हाला दिली नाही. आम्ही सुद्धा इंडिया आघाडीत आहोत. पश्चिम बंगालबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. इतर राज्यात काय करणार याचा विचार आम्ही नंतर करू, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये भाजपचा सामना आम्ही एकट्याने करू शकतो, असे त्या म्हणाल्या. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी कोणतेही पाऊल मागे घेणार नाही. त्याच भावनेने आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहोत.
वाटेत स्पीड ब्रेकर येतात
जयराम रमेश म्हणाले की, तुम्ही लांबचा प्रवास करत असताना कधी वाटेत स्पीड ब्रेकर येतात, कधी लाल दिवे येतात. आम्ही स्पीड ब्रेकर ओलांडतो. याचा अर्थ आपण प्रवासातून मागे हटावे असा नाही. आम्ही स्पीड ब्रेकर ओलांडतो. लाल दिवा हिरवा होण्याची वाट पाहतो, इंडिया आघाडीत सर्व काही सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले.