गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक केली जाईल, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी केला. राज्यात हिंसाचार भडकवल्याप्रकरणी राहुलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनी मंगळवारी काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यान हिंसाचार भडकवल्याच्या आरोपावरून राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर अनेक पक्षांच्या नेत्यांविरोधात स्वत:हून एफआयआर नोंदवला होता.
सरमा यांनी सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे एका कार्यक्रमावेळी सांगितले की, आम्ही एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करणार असून लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करण्यात येणार आहे. काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंग म्हणाले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) यांनी स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत कसून तपास करण्यासाठी हे प्रकरण आसाम सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना बॅरिकेड तोडण्यासाठी जमावाला भडकवल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते.
वास्तविक राहुल गांधींच्या यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेश दिला जात नव्हता. त्यासाठी मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. काँग्रेस समर्थकांनी बॅरिकेड्स हटवल्यानंतर त्यांची पोलिसांशी झटापट झाली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया जखमी झाले.