31 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण मोर्चाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम

मराठा आरक्षण मोर्चाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम

नवी मुंबई : मराठा आरक्षण मोर्चाचा वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील मुक्काम एक दिवस वाढल्याने मुंबई आणि उपनगरांना पुरवठा होणा-या भाजीपाल्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. शेतमालाच्या गाड्यांची आवक १५ ते २० टक्के अल्प झाली,तर १० टक्के माल खराब झाल्याने मराठा आरक्षण मोर्चाचा एपीएमसीतील व्यापा-यांसह शेतक-यांना फटका बसला. मराठा आरक्षणाबरोबरच सरकारने शेतकरी आणि व्यापारी, ग्राहक यांचाही विचार करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया अनेक व्यापा-यांनी व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाकडून अध्यादेश मिळेपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यावर आझाद मैदानाच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर असलेल्या सर्व गाड्या सायंकाळी पार्किंगसाठी एपीएमसी मार्केटमध्ये आल्या. त्यामुळे शनिवारी देखील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. तसेच मुंबईकरांना भाजीपाल्याचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्यातील शेतमालाच्या गाड्या थेट मुंबईत सोडण्याचे परिपत्रक रात्री विलंबाने काढले. त्यामुळे अचानक एवढ्या गाड्या मुंबईत कशा प्रकारे आणि कुठे न्यायच्या, सर्व माथाडी कामगार मोर्चामध्ये असल्याने मुंबईत शेतमाल खाली कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी शेतमालाच्या अंदाजे ४५० गाड्या सायंकाळपासून भाजीपाला मार्केटच्या बाहेर आल्या. त्यामुळे व्यापा-यांनी या गाड्या मुंबईमध्ये थेट पाठवण्याऐवजी मार्केटबाहेर व्यापार केला, अशी माहिती भाजीपाला बाजारपेठेचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.

परिणामी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा आणि बाहेरील रस्त्यांवर दोन लेनमध्ये सर्वत्र याच गाड्या उभ्या होत्या. रात्री दहा वाजल्यापासून या ठिकाणी भाजीपाला व्यापा-यांनी त्यांचा व्यापार सुरू केला होता. तो दुस-या दिवशी सायंकाळपर्यंत चालू होता. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा आलेल्या शेतमालाच्या गाड्या दुपारनंतरही उघडल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे लाखो रुपयांचा शेतमाल खराब झाल्याने तो फेकून द्यावा लागल्याने शेतकरी आणि व्यापा-यांचे नुकसान झाले. फळे, कांदा-बटाटा आणि भाजीपाला या तीनही शेतमालांच्या गाड्या दुपारनंतर टप्प्याटप्प्याने आतमध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली आणि व्यापा-यांनी काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या मालाची विक्री केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR