अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर लोकार्पण झाल्यानंतर देशभरातील लाखो भाविक रामदर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोट्यवधींचे दान, सोने-चांदीच्या वस्तूही भाविक श्रीरामचरणी अर्पण करत आहेत.
रामललाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून लाखो भाविक भव्य राम मंदिरात पोहोचत आहेत. हा आकडा सातत्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून शनिवारी राम मंदिर परिसराचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला. आयुक्तांनी माहिती देताना सांगितले की, दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत. आधी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असे. मात्र, आता यात बदल झाला आहे. रामदर्शनासाठी भाविक समूहाने येत आहेत. आगामी काळातही हाच ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.
दर्शनाची वेळ वाढविली
रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने रामललाची आरती आणि दर्शनाची वेळ वाढवली आहे. रामभक्त रामललाच्या दरबारात मोठ्या प्रमाणावर दान करत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून राम मंदिरासाठी देणगी घेतली जात आहे. दरम्यान, प्राप्त आकड्यांनुसार, आतापर्यंत कोट्यवधींची देणगी मिळाली आहे. रामलला दर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी ९० लाख रुपये, २४ जानेवारीला २ कोटी ४३ लाख रुपये, २५ जानेवारीला ८ लाख ५० हजार रुपये आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी १ कोटी १५ लाख रुपये दान करण्यात आल्याचे समजते.