निलंगा : प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी धाड मारून १ लाख ३७ हजाराचा गुटखा जप्त केला असून दोन्हीही दुकानदार फरार झाले तर तब्बल तीस तासाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाडगा नाका भागातील विठ्ठल संभाजी जाधव यांचे विठ्ठल किराणा स्टोअर्स येथे छापा मारून ४५ हजार २९९ रु. चा विविध प्रकारच्या नमुन्याचा गुटखा जप्त करण्यात आला तर आरोपी विठ्ठल संभाजी जाधव हा फरार असून याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड हे करीत आहेत.
तर याच भागातील अंकुश पाटील यांच्या वैष्णवी किराणा दुकानावर धाड मारून सुमारे ९२ हजार २६५ रुपयाचा गुटखा जप्त करून निलंगा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ हे तपास करीत असून आरोपी अंकुश पाटील फरार आहे. याप्रकरणी अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी लातूर विठ्ठल सटवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरून वरून दोन्हीही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कर्नाटकातून मोठी आवक
शेजारी कर्नाटक राज्याची हद्द असल्यामुळे बसवकल्याण, भालकी, बिदर येथून औराद शहाजानी , ममदापूर, कासारशिरशी व तांबाळा या बॉर्डर वरील गावातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये गुटख्याची चोरटी आवक होत असते. विशेष म्हणजे बॉर्डरवरून ये-जा करणा-या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांची तपासणी पोलीस प्रशासनाकडून चोखपणे केली जाते. तरीही ही अवैद्य गुटख्याची वाहने महाराष्ट्रात कसे प्रवेश करतात असा प्रश्न उपस्थित करीत यावर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.