परभणी : एका शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महापुरुषांचे चित्र काढून आणण्यास सांगितले होते. काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांचे फोटो आणले तर एका विद्यार्थ्याने टिपू सुलतान यांचे चित्र काढून आणले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे वर्गामध्ये लावण्यात आली. आठ दिवसानंतर बजरंग दलवाल्यांनी शाळेत येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. टिपू सुलतान चे चित्र वर्गात का लावण्यात आले आणि ते चित्र ज्या विद्यार्थ्यांनी काढले त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाका अशी मागणी करत गोंधळ घातला. असा प्रकार एका शाळेत घडला असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
बजरंग दलाच्या या कृतीवर टीका करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मी खासदार होऊन लोकसभेमध्ये गेलो आणि तेथे संविधानाची मूळ प्रत आहे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्या संविधानामध्ये देखील टिपू सुलतानचा फोटो आहे. संविधानामध्ये जर टिपू सुलतान चा फोटो असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये टिपू सुलतानाला विरोध करण्याचे कारण काय? हे मवाली टपोरी बजरंग दलवाले यांनी संविधान पाहिले आहे का? असाही सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या 300 खासदारांच्या समोर असदुद्दीन ओवेसी यांनी असे म्हटले होते की, या देशामध्ये जर सगळ्यात मोठा महापुरुष जन्माला आला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना तकलीफ झाली कारण भारतीय जनता पार्टीच्या नजरेमध्ये सावरकर हे महापुरुष आहेत. मात्र अशा पळ काढणारे व्यक्तीला आम्ही कधी महापुरुष मानत नाही आणि यापुढेही मानणार नाही, असं वक्तव्य एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणीच्या पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यामध्ये केले आहे. जलील यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.