25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: यानिक सिन्नेर नवविजेता

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: यानिक सिन्नेर नवविजेता

मेलबर्न : दोन सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना इटलीच्या २२ वर्षीय यानिक सिन्नेरने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. पाच सेट आणि जवळपास चार तास चाललेल्या अंतिम लढतीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करताना सिन्नेरने कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. चौथ्या मानांकित सिन्नेरने अंतिम लढतीत तिस-या मानांकित मेदवेदेववर ३-६, ३-६, ६-४,६-४, ६-३ अशी सरशी साधली.

सिन्नेरने उपांत्य फेरीत अग्रमानांकित आणि २४ ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला होता. मात्र, अंतिम फेरीत त्याला पहिल्या दोन सेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तो पराभवाच्या छायेत होता. परंतु त्याने लढवय्या वृत्ती दाखवली आणि सलग तीन सेट ंिजकले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा सिन्नेर हा इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.

मेदवेदेवची मात्र पुन्हा निराशा झाली. २०२१च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या विजेत्या मेदवेदेवला ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सहापैकी पाच अंतिम सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.यंदाच्या स्पर्धेत मेदवेदेवने तीन लढती पाच सेटमध्ये जिंकल्या. अंतिम लढतही पाचव्या सेटमध्ये गेल्यानंतर त्याचेच पारडे जड मानले जात होते.

परंतु सिन्नेरने अचूक खेळ करताना मेदवेदेववर वर्चस्व गाजवले. निर्णायक पाचव्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना सिन्नेरने प्रथम आपली सव्­र्हिस राखली, मग मेदवेदेवची सव्­र्हिस तोडत ४-२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिन्नेरने पुन्हा दमदार सव्­र्हिस करताना आपली आघाडी वाढवली. मेदवेदेवला आपली पुढील सव्­र्हिस राखण्यात यश आले. मात्र, नवव्या गेममध्ये सिन्नेरने वेगवान सव्­र्हिस केली आणि याचे मेदवेदेवकडे उत्तर नव्हते. त्यामुळे सिन्नेरने हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मेदवेदेव ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन सेटची आघाडी असूनही दुस-यांदा पराभूत झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्पर्धेतच २०२२मध्ये त्याला राफेल नदालने दोन सेटची पिछाडी भरून काढताना नमवले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR