लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने वासनगाव शिवारात एका ढाब्याच्या पाठीमागे चालणा-या अवैध जुगारावर शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. मात्र अंधाराचा फायदा घेत १३ पैकी १० जुगारी पळून जाण्यात यशस्वी ठरले. तरीही रात्रगस्त दरम्यान झालेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने १३ इसमांविरुध्द लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत ६ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री लातूर ते औसा जाणारे रोडवर वासनगाव शेत शिवारामध्ये एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेडमधील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी ६ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पैशावर तिर्रट जुगार खेळला व खेळविला जात होता. त्यात गणेश शरणप्पा चटनाळे, (वय २५ वर्षे, रा. कळंब रोड लातूर), ताहेर युसुफ शेख, (वय ३३ वर्षे रा. कळंब जि.उस्मानाबाद), नसीर इब्राहीम कुरेशी, (वय ३३ वर्षे रा. कुरेशी मोहल्ला, लातूर) यांंच्यासह आकाश होदाडे (फरार), अहर सयद रा. खडक हनुमान लातूर.(फरार), आपटे रा. आंबेजोगाई (फरार), गणेश रा. लातूर (फरार), अल्ताफ रा.लातूर (फरार), महेश गायकवाड रा.वसवाडी ता. लातूर (फरार), महम्मद रा. पटेल चौक लातूर (फरार), अझहर सयद रा.साठफुटी रोड लातूर (फरार), सचिन काळे, रा.राठोडा (फरार) व मनोहर देविदास (रा. कन्हेरी तांडा लातूर) (फरार) यांचा समावेश होता. यातील दहाजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आकाश होदाडे (फरार) याच्या कमरेला असलेली स्टीलची सुरी जागेवरच टाकून तो पळून गेला. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तेराजणांविरुध्द इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) व भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लातूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.