19.4 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रकुणबी दाखला असलेल्यांचाच ‘ओबीसी’मध्ये समावेश

कुणबी दाखला असलेल्यांचाच ‘ओबीसी’मध्ये समावेश

मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

नागपूर : महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी अधिक तीव्रतेने आंदोलन करत होता. अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने यावर तोडगा काढला. राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने बातचीत करून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर रोखला. तसेच मराठा आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या.

मराठा समाजाचा कुणबी दाखल्यांसह (नोंदी असलेल्या) ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. तसेच त्यांच्या सगेसोय-यांनाही शपथपत्रावर ओबीसीत सामील करून घेतलं जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलक माघारी फिरले असले तरी ओबीसी नेते मात्र संताप व्यक्त करत आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच पक्षातून बाहेर पडण्याबाबत वक्तव्य केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मला राज्याला स्पष्टपणे सांगायचं आहे की, भारतीय जनता पार्टी या सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाही असं वाटलं तर मी स्वत: माझ्या वरिष्ठांशी बोलेन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR