मुंबई : अर्जदाराने पाच बायकांशी विवाह केला, त्या बायकांची फसवणूक केली, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने अर्जदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अर्जदाराने अनेक महिलांना फसविले, हे दर्शविणारे ठोस पुरावे आहेत, असा निष्कर्ष न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने काढला. अर्जदार शांतिलाल खरात याच्या एका पत्नीने रायगड पोलिस ठाण्यात तक्रार केली. अटकेच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तक्रारीनुसार, खरात याच्यासोबत महिलेची एप्रिल २०२२ मध्ये मेट्रिमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांत त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर खरातने तिच्याकडे आर्थिक मदत मागितली आणि तिने त्याला सात लाख रुपये दिले. तसेच दागिन्यांच्या बदल्यात ३२ लाख रुपयांचे कर्जही घेतले.
जामीन अर्जावरील सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, आरोपीने केवळ अनेक विवाह केले नाहीत तर त्याला दोन मुलेही आहेत. २००९ मध्ये दोन मुलींचे जन्मदाखले देण्यात आले. त्यात मुलींच्या आईची नावे वेगळी आहेत. पण वडिलांचे नाव एकच आहे आणि ते आरोपीचे आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपात तथ्य आहे, असे म्हणत न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळली.
संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत असताना तक्रारदाराला समजले की, आरोपीने तिच्याशी विवाह करण्यापूर्वी चार विवाह केले आहेत आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे.