अमरावती : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालेले असताना प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडूंनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. ‘जातीसाठी काही केले, तरच नाव होते, शेतक-यांसाठी काही केले तर नाव होत नाही’, अशा आशयाचे विधान करून बच्चू कडूंनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
बच्चू कडूंनी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सध्याच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर भाष्य केले. ‘आम्ही जेव्हा आसूड यात्रा काढली होती, तेव्हा काही शेतकरी आमच्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या शेतात पाणी सोडले जात नाही. त्यानंतर आम्ही सरकारला त्यासंदर्भातले निवेदन द्यायला गेलो. त्या आंदोलनाबाबत आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्या शेतक-यांना पाणी मिळत आहे. पण आम्ही मात्र सध्या कोर्टात येरझा-या मारत आहोत. ते शेतकरी आम्हाला दिसत नाहीत. पण आम्ही कोर्टात दिसतोय. हा फरक आहे. शेतक-यासाठी काही कराल तर फार नाव होत नाही. जातीसाठी काही केले तर माणूस मोठा होतो’, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
शेतक-यांच्या हक्काची लढाई मागे
एवढे मोठे निर्णय शेतक-यांच्या विरोधात एका मिनिटात घेतले जातात. शेतक-यांच्या डोक्यात संताप का नाही? जातीसाठी लोक पेटतात, तसे शेतक-यांसाठी लोक पेटू लागले की जाती-धर्माचे प्रश्न बाजूला पडून शेतीचे प्रश्न अजेंड्यावर येतील. आम्ही तो प्रयत्न करू. राम मंदिर, मशीद, पुतळे, बुद्धविहार हे आमच्यासाठी बलस्थाने आहेत. पण शेतकरी-मजुरांची हक्काची लढाई मागे पडतेय. जाती-धर्माची लढाई पुढे येतेय, असे बच्चू कडू म्हणाले.