वाराणसी : ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यादरम्यान म्हैसूरमधील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाला ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर तीन तेलुगु भाषेतील शिलालेख सापडले आहेत.
एएसआय संचालक के. मुनीरत्नम रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काशी विश्वनाथ मंदिरासंबंधी दाखल केलेल्या अहवालात ३४ शिलालेख सापडल्याचे म्हटले त्यापैकी तीन शिलालेख हे तेलुगु भाषेतील आहेत.
हे शिलालेख १७ व्या शतकातील असून यामध्ये नारायण भाटलू त्यांचा मुलगा मल्लाना भाटलू अशा नावांचा स्पष्टपणे उल्लेख आढळतो.
नारायना भाटलू हे तेलुगु ब्राम्हण आहेत, ज्यांनी १५५८ साली काशी विश्वनाथ मंदिराच्या बांधकामाच्या देखरेखीचे काम केले होते. असे सांगितले जाते की, जौनपूरचे सुलतान हुसेन शराकी (१४५८-१५०५) याने पंधराव्या शतकात काशी विश्वनाथ मंदीर पाडण्याचे आदेश दिले होते. हे मंदिर १५८५ साली पुन्हा बांधण्यात आले. राजा तोडरमल यांनी दक्षिणेतील तज्ञ नारायण भाटलू यांना मंदीराच्या बांधकामावर देखरेख करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता सापडलेले शिलालेख हे त्याला दुजारा देतात.
हे शिलालेख ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर कोरण्यात आले आहेत आणि ते तेलुगु भाषेत आहेत. जरी हे शिलालेख नुकसान झालेले आणि अपूर्ण असले तरी यामध्ये मल्लाना भाटलू आणि नारायण भाटलू यांचा उल्लेख आढळतो असेही एएसआय डायरेक्टर म्हणाले.
मशिदीत आढळलेल्या दुस-या शिलालेखात ‘गोवी’ असा उल्लेख देखील आढळला आहे. गोवी याचा अर्थ मेंढपाळ असा होतो.
तिसरा शिलालेख हा १५ व्या शतकातील असून तो मशिदीच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापडला. यामध्ये १४ ओळी आहेत ज्या पुर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे एएसआय तज्ञाचे म्हणणे आहे. तेलगु भाषेसोबतच कन्नड, देवनागरी आणि तामिळ भाषेतील शिलालेख देखील आढळले आहेत.
एएसआय सर्व्हे रिपोर्टमध्ये खुलासा झाला की, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एकेकाळी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते. दरम्यान अहवालात असे म्हटले आहे की, मशिदीची पश्चिम भिंत हिंदू मंदिराचा भाग आहे आणि ३२ हिंदू मंदिरांचे शिलालेख सापडले आहेत.