नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची सलग तिस-यांदा आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच एसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचा बॉस म्हणून ही त्यांची तिसरी टर्म असेल. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इंडोनेशियातील बाली येथे आशिया कप २०२५ संदर्भात बैठक सुरू आहे.
आशिया कपचा पुढील हंगाम आता २०२५ मध्ये होणार आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. यापूर्वीची स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली होती.
जय शहा यांचा दुसरा कार्यकाळ अजून संपलेला नाही आणि तिस-यांदाही त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण नोव्हेंबरमध्ये आयसीसीच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा जय शहा निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता आहे.
एकप्रकारे त्यांना आशिया खंडाचा पाठिंबा मिळाला आहे. जय शहा सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत, जे मोठे पद आहे.
जय शहा यांनी ३० जानेवारी २०२१ रोजी एसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यांच्या आधी पाकिस्तानचे नजमुल हसन आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते. जय शहा ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआयच्या सचिवपदी कार्यरत आहेत. त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते, आता रॉजर बिन्नी या पदावर आहेत. परंतु जय शहा यांचा सचिवपदाचा कार्यकाळ कायम आहे.