निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील झरी येथे दि़ १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ च्या दरम्यान झालेल्या कंटेनर व मोटरसायकलच्या विचित्र अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे झरी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , निलंगा तालुक्यातील उदगीर निलंगा रोडवरील झरी येथे झालेल्या कंटेनर व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव वय २२ वर्षे , चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय ३८ वर्षे हे दोघेजण आठ दिवसापूर्वीच खरेदी केलेल्या मोटरसायकलवरून शेताकडे दूध काढण्यासाठी जात होते . समोरून येणा-या कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने पुतण्या चुलती दोघे जागीच ठार झाले. तर या गावचे माहेरवाशी असलेली अक्षरा किशन सूर्यवंशी वय ६५ वर्षे ही महिला पहाटे प्रात विधीसाठी जात होती. मोटर सायकल सह या महिलेलाही जोराची धडक लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
यामुळे झरी गावावर शोककळा पसरली आहे. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते .तब्बल तीन तास उदगीर निलंगा या मार्गावरची वाहतूक बंद होती. पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आडवे पडलेल्या कंटेनरला बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. कंटेनर व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.