मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता सत्ताधारी महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे शासन निर्णय जारी केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात हल्लाबोल केला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांवर घणाघाती टीका करत कंबरेत लाथ घालून मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, अशी मागणी केली. गायकवाड यांच्या या खरमरीत टीकेवर छगन भुजबळ यांनी आज प्रतिक्रिया देत ते वक्तव्य ऐकून मला वाईट वाटल्याचे म्हटले आहे.
संजय गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केले ते ऐकून थोडे वाईट वाटले. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे, तसाच तो आमदारांनाही आहे. मात्र त्यांनी जी भाषा वापरली ती काही बरोबर नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आमदार गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना भुजबळांनी त्यांना टोलाही लगावला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “गायकवाड ज्या शिवसेना नावाच्या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत, त्या विद्यापीठात मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरली पाहिजे. त्याबद्दल त्यांचे जे नेते आहेत ते शिंदे साहेब पाहतील. तुम्ही सांगितलं की, कंबरेत लाथ घालून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे आणि तो अधिकार मला मान्य आहे. मात्र दुसरं जे वक्तव्य आहे की कंबरेत लाथ घाला, असं ते म्हणाले. पण मला वाटतंय ते तसं काही करणार नाहीत. कारण गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे नेते ज्या आनंद दिघे यांना गुरू मानतात त्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की, अशा प्रकारे लाथ घालण्याची भाषा करणं योग्य नाही.
बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी राष्ट्रवादीत?
काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी आणि आमदार झिशान सिद्दिकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. याबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझ्यासाठी ही बातमी आहे, याबाबत मला काही कल्पना नाही. त्यांची जी काही चर्चा झाली असेल ती अजित पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी झाली असेल.