पोलादपूर : तुम्ही आज आमच्या माणसांना त्रास देतायेत. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्या घरी ईडी पाठवली. शिवसैनिकांच्या घरात काही ठिकाणी मुंबईच्या झोपडीतही यांची पथके गेली. मग ज्यांच्यावर आरोप केले होते ते तुमच्या पक्षात आले त्यांच्या चौकशीचे काय झाले? ज्यांनी त्यांच्यावर धाड टाकली तेच आता रक्षक म्हणून पुढे आलेत. जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेतायेत. त्यामुळे इतर पक्ष भ्रष्टाचारीमुक्त झाले. दुस-याचा भ्रष्टाचार स्वत:वर घेऊन त्यांना स्वच्छ केले जाते ही मोदी गॅरंटी असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौ-यावर आहेत. आजच्या पोलादपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ईडी चौकशीवरून भाजपाला फटकारले. ते म्हणाले की, माझ्यावर जी जबाबदारी आली ती मी प्रामाणिकपणे पार केली. मुख्यमंत्री असताना कोरोना काळात जे काम केले, तुम्हाला चौकशी करायची असेल तर आधी पीएम केअर फंडासाठी लाखो, कोटी जमा केले त्याची चौकशी करा त्यानंतर माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा. मुंबई महापालिकेचे अधिकारी कोर्टात गेले, ते कशासाठी आम्ही चौकशी करताय असे विचारतायेत. किशोरी पेडणेकर या महापौर होत्या, पण त्यांची सही कुठे नव्हती. जे काही टेंंडर दिले त्यावर तत्कालिक आयुक्तांची सही होती, मग त्यांना अटक का करत नाही. तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून पवित्र झाला? गेल्या २ वर्षात मुंबई महापालिकेत प्रशासकीय घोटाळा सुरू आहे. मुंबईत जसे घोटाळे होतायेत तसे देशभरात सुरू आहे. चंदिगडच्या महापौर निवडणुकीत विरोधकांची मते बाद केली त्यानंतर भाजपाचा महापौर जिंकला असे जाहीर केले. लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय तरी आम्ही काहीच करायचे नाही असे त्यांनी म्हटले.
तसेच गद्दारांना डोकं नाही म्हणून त्यांनी गद्दारी केली. आम्ही अन्यायावर वार करणारे वारकरी आहे. आपला झेंडा, पताका, धर्म एकच आहे. जो भगवा आपल्या छत्रपतींचा आहे. त्यात छेद करणारे भाजपाचे गोमूत्रधारी आलेत त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. रायगडमधून आपलाच खासदार येणार, आणायलाच हवा. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते तर मोदींचे वाजपेयींनी काय केले असते हे विसरू नका. शिवसेनाप्रमुखांचे ऋण विसरू नका. मी जनसंवाद करत नाही तर माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला आलोय. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मी राज्यातील जनतेसाठी केली होती. अख्खा महाराष्ट्र मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात हे केवढं मोठे भाग्य आहे. काही जणांना दारोदारी जाऊनही विचारले जात नाही. सरकार आपल्या दारी असे कुणी म्हटले तर लोक म्हणतात जा तुझ्या घरी.., रायगडच्या वा-याने मोठमोठी सरकार उलथापालथ केली. दिल्लीला झुकवले आहे. वीरांच्या भूमीत झेंडा बाजूला मात्र नॅपकिन फडकवणारे आलेत. ही गद्दारांची भूमी नाही. ही भूमी जिथे शूरवीर, निष्ठावंत जन्माला आले त्याच भूमीत गद्दारांना रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असे सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली.