अलिबाग : अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीस दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपये कांदा माळ विक्री केली जात आहे.
अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहे. यंदा उत्पादन गतवर्षी पेक्षा अधिक झाल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा शेतक-यांना कांद्याचा भाव कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावात पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबाग मधील २५० हेक्टर वर कांदा लागवड केली जाते. यंदा अवेळी पाऊस पडल्याने कांदा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र तशी वेळ शेतक-यांवर आली नाही. यावेळी तालुक्यात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.
अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतक-याकडे येत असतो. गतवर्षी मणाला १४०० रुपये दर व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता. यावेळी आठशे ते अकराशे दर दिला जात आहे. मात्र उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरवली आहे. भाव कमी होईल या आशेने व्यापारी आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतक-यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले. व्यापारी वर्ग अद्याप आले नसल्याने शेतक-याने रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे.