अमरावती : दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोळेगाव फाट्याजवळ अवैध जनावरे घेऊन जाताना वाहन उलटून अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालकासह वाहनातील सहा जनावरांचाही मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने वाहन असल्याने टायर फुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून वाहनाला जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आले. घटनेचे माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर दर्यापूर ते अकोला मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अवैध जनावरांच्या वाहुतुकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशातच दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेत वाहन चालकासह निष्पाप ६ जनावरांचा मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गावर गायींची तस्करी
काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करीचे प्रकरण समोर आले होते. वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर ५० पेक्षा जास्त गाई आढळल्या. या घटनेनंतर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणा-या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.