मुंबई : लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे. एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरियानासह अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. एकत्रित निवडणुका झाल्यास सर्वच बचत होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात ‘एक देश-एक निवडणूक’चा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.