24.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी अजित पवारांचीच

राष्ट्रवादी अजित पवारांचीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शरद पवार यांना आज सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा मोठा झटका आहे. त्यातच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने उद्यापर्यंत (७ फेब्रुवारी) चिन्हाबाबत कळवावे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देऊन त्यांचा मार्ग प्रशस्त केल्याने आमदार अपात्रता निर्णयही अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगितले होते. महाराष्ट्रातील ४१ आमदार आणि नागालँडमधील ७ आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील २ खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ५ आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्रे दिलेली आहेत. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता पर्याय असेल. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचे, हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता.

गेली ६ महिने यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. या सुनावण्यांसाठी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहायचे तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे नेते सुनावण्यांसाठी हजर असायचे. अखेर सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली तर निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

शरद पवार गटाला ३ पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे. या अगोदर उद्धव ठाकरे यांनाही असाच धक्का बसला होता. त्याचीच पुनरावृत्ती निवडणूक आयोगाच्या निकालातून झाली आहे.

अजित पवार गटाचे सेलिब्रेशन
अजित पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी अजित पवार गटाने फटाके फोडून आणि पेढे भरवून सेलिब्रेशन केले. सर्वत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR