21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeनांदेडलोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडारा महाप्रसादातून विषबाधा

लोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडारा महाप्रसादातून विषबाधा

दोन ते अडीच हजार रुग्णांवर उपचार सुरू

लोहा : लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परिसरात संत बाळुमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा प्रसादात काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर व आमटी हा महाप्रसाद करण्यात आला होता. सावरगाव, कोष्टवाडी, हरणवाडी , पेंडू, सादलापूरसह परिसरात अन्य गावांतील व्यक्तींना तो भंडा-याचा महाप्रसाद सेवन केल्याने या महाप्रसादातून विषबाधा झाली असून यामध्ये २ ते अडीच हजार लोकांचा समावेश आहे.

सदरील रुग्णांना शासकीय रुग्णालय लोहा तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एसटी बससह अन्य खासगी वाहनांनी काही रुग्णांना शासकीय रुग्णालय नांदेड, अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वांना उपचार प्रक्रिया चालू असून पोलिस निरीक्षक, नायब तहसीलदार, असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न चालू आहेत.
सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत, वाहने पण उपलब्ध आहेत, सरकारी दवाखान्यासह औषध पुरवठा पण उपलब्ध आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अशी माहिती लोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे.

भाविकांना जुलाब व उलट्यांचा त्रास
भगर खाल्यानंतर थोड्या वेळाने उलट्या, जुलाब, मळमळ, चक्कर येणे सुरू झाले. यामुळे गोंधळ निर्माण झाला. बाधित भाविकांना तातडीने मिळेल त्या वाहनाने नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तर काही भाविकांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अचानक मोठ्या प्रमाणात आलेल्या रुग्णांमुळे दवाखान्यात देखील धावपळ उडाली. सध्या नांदेड आणि अहमदपूर येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार कळताच प्रशासन देखील तयारीला लागले. पोलिस प्रशासनाने पहाटे दोन-अडीच वाजेच्या सुमारास शहरातील खाजगी रुग्णालय उघडून रुग्णांवर उपचार सुरू केले.

विषबाधाग्रस्तांवर योग्य ते उपचार : अशोक चव्हाण
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे एका महाप्रसाद कार्यक्रमानंतर काल रात्री सावरगाव, रिसनगाव, हरणवाडी, मुरंबी, आष्टुर व परिसरातील तांडे-वस्तीवर राहणा-­या हजारो नागरिकांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा हा प्रकार समोर आला. काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार पाटील व इतर अनेक जागरूक नागरिकांनी रात्रभर धावपळ करून रुग्णांसाठी उपचार, औषधे व वाहनांची व्यवस्था केली. विषबाधाग्रस्तांना लोहा, अहमदपूर, नांदेड आदी शहरांमध्ये हलविण्यात आले. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील मोठ्या संख्येने रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. स्थानिक आमदार मोहनअण्णा हंबर्डे रुग्णालयात पोहोचले असून, मी देखील रुग्णालयात जाऊन माहिती घेणार आहे.

परभणी जिल्ह्यात भगर व आमटीतून २०० जणांना विषबाधा
दुस-या घटनेत परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावात २०० जणांना भगर आणि आमटीतून विषबाधा झाली. माळसोन्ना गावात मंगळवारी हरिनाम सप्ताह सुरू होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले. भगर खाल्ल्यावर थोड्याच वेळात भाविकांना उलटी, जुलाब, चक्कर येऊ लागली. यामुळे गोंधळ उडाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR