उदगीर : दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर मार्ग शोधत पोलिस ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला आहे. विशेष म्हणजे याचा एक फोटो देखील समोर आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या अधिका-यांनी कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात होणे आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिका-याच्या सुपिक डोक्यातून बाहेर आली. त्यामुळे या वरिष्ठ अधिका-याने क्रमांक तीनच्या अधिका-यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिका-यांनी तयारी सुरू केली. यातील एका अधिका-याने एक बोकड आणि त्याला कापणा-या कसायाला पोलिस ठाण्यात आणले. विशेष म्हणजे हा बोकड थेट पोलिस ठाण्याच्या गेटवरच कापण्यात आला. पोलिसांच्या कृतीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
बोकडाच्या मटणाची बिर्याणी बनवली…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाराला संपूर्ण पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांची संमती होती. कारण बोकड कापताना ते फोटो काढत होते. त्यानंतर या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणी याच भागातील एका फार्महाऊसवर बनविण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यातील अंधश्रद्धा संपवण्यासाठी सरकारकडून कायदे केले जात असून, याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात चक्क पोलिसच अंधश्रद्धेचा बाजार मांडत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.