लातूर : प्रतिनिधी
वृक्षतोडीमुळे हवामानात बदल झाला असून शेतीला आणि मानवी जीवनालाही यापासून धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचे नुकसान होत असून त्याचा परिणाम शेतक-यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतक-यांनी बांबू लागवडीकडे वळणे आवश्यक असून यासाठी राज्य शासनामार्फत सहाय्य केले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित लातूर जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूर पटेल, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष चोले उपस्थित होते. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माती परीक्षण पुस्तिका आणि सोयाबीन लागवड तंत्रज्ञान पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील महिला बचतगटांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ५ कोटी १४ लाख ४० हजार रुपयांचा चेक यावेळी महिला बचतगटांच्या पदाधिक-यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी घुगे म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश असून आपली नाळ शेतीशी जोडलेली आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विविध संकटे येत आहेत. यावर मात करण्यासाठी, तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्न करण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतीमध्ये वापर करणे आवश्यक आहे. यासोबतच कृषि उत्पादनांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यावर भर देण्याची गरज असून यासाठी शेतक-यांना एकत्रित येवून शेतकरी उत्पादक कंपनी सुरु करता येईल. तसेच शेती हा प्रशासनाचा नेहमीच प्राधान्याचा विषय राहिला असून शेतक-यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन सदैव उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सागर म्हणाले की, शेतीमधील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग करून अधिक दर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
आज ऊस पिक लागवडीबाबत मार्गदर्शन जिल्हा कृषि महोत्सवात शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ऊस उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान व विक्रमी ऊस उत्पादनाचा शेतक-यांचा स्वानुभव विषयावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील ब्रह्मदेव नवनाथ सरडे मार्गदर्शन करणार आहे.
दुपारी २ वाजता ऊस पिकातील सुधारित वाण व हंगामनिहाय पिक व्यवस्थापन याविषयावर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील मध्यवर्तीय ऊस संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त ऊस पैदासकार डॉ. भारत रासकर यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी ३.३० वाजता राजाराम सूर्यवंशी यांचे फर्टीगेशन, ठिबक सिंचन संच देखभाल व आम्लप्रक्रिया विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५ वाजता लोकगीते होतील.