इस्लामाबाद : पाकिस्तानात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात भारतीय संरक्षण तज्ज्ञ निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांना रक्तरंजित निवडणुका असे संबोधले जात असल्याचे ते म्हणाले. निवृत्त ब्रिगेडियर गुप्ता म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराला नवाझ शरीफ यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. पाकिस्तानी लष्कराला तिथल्या सरकारवर आपले नियंत्रण ठेवायचे आहे आणि स्वत:च्या इच्छेनुसार देश चालवायचा आहे. हे योग्य नाही पण तिथल्या लष्कराला नवाझ शरीफ यांनाच पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे असा दावा त्यांनी केला.
येथे कोणताही विरोधी पक्ष नाही याची पाक लष्कराला पूर्ण जाणीव आहे. इम्रान खान तुरुंगात आहेत. याशिवाय त्यांच्या पक्ष पीटीआयचे अनेक नेतेही तुरुंगात आहेत, त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादाने नवाझ शरीफ देशाचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत. या निवडणुकीची सर्वात मोठी आणि खास गोष्ट म्हणजे पाकिस्तानी लष्कर पुन्हा एकदा देशातील दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. लश्कर-ए-तोयबा, हाफिज सईदचा पक्ष आणि अनेक दहशतवादी संघटना आहेत, जे छद्म नावाने निवडणूक लढवत आहेत, जे खूपच धोकादायक आहे. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नसायला हवा होता, पण तसे होताना दिसत नाही अशी भीती गुप्ता यांनी व्यक्त केली.
काश्मीर भारताचा होता, आहे, पुढेही राहील!
काश्मीर प्रश्नाबाबत ब्रिगेडियर गुप्ता म्हणाले की, काश्मीर हा मुद्दा नाही, तो भारताचा भाग होता, आहे आणि राहील. संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्य १९४७ मध्ये भारतात सामील झाले, परंतु पाकिस्तान सरकारनेच हल्ले केले आणि राज्याच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला, जो अजूनही सुरुच आहेत.
पाकिस्तानात १२ कोटी नवमतदार
आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमध्ये आज १२.८५ कोटी मतदार नवीन सरकारची निवड करणार आहेत. या निवडणुकीत ५१२१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.