27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकर भाजपावर नाराज?

गोपीचंद पडळकर भाजपावर नाराज?

नव्या संघटनेची केली घोषणा नाराजीवर थेट बोलले

सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन केले. त्यामुळे पडळकर भाजपावर नाराज आहेत का अशी चर्चा होऊ लागली. यावर गोपीचंद पडळकरांनी आपण पक्षावर नाराज नाही, माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असे स्पष्ट सांगितले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी गेल्या १०-१५ वर्ष राजकीय, सामाजिक चळवळीत आहे. महाराष्ट्रभर दौरे करताना अनेक युवकांचे म्हणणे होते, तुम्ही संघटना काढावी. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल. युवकांना जोडता येईल. त्यामुळे युवकांची मागणी लक्षात घेता हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना ही संघटना मी काढली आहे. त्या संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन आम्ही केले. युवकांचा खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय असे त्यांनी सांगितले.

तसेच गावगाड्यातील उपेक्षित वंचित, पीडित युवक आहेत. त्या सगळ्या समाजाच्या युवकांना एकत्रित करायचे आणि प्रस्थापितांविरोधात लढा द्यायचा, विस्थापितांना मानाचे सिंहासन मिळवून द्यायचे यासाठी संघटनेची स्थापना केली. या माध्यमातून राज्यभरात हजारो शाखा येत्या काही महिन्यात स्थापन होतील. मी जरी भाजपाचा सदस्य असलो तरी आम्ही अराजकीय संघटना स्थापन केली. कुठल्याही पक्षातील, विचारधारेतील युवक आमच्या संघटनेत काम करू शकतो. अराजकीय संघटना स्थापन करायला काहीच हरकत नाही. संघटना काढण्याचा हेतू म्हणजे युवकांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ दिले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून युवक संपर्क साधतायेत, युवकांची बांधणी करून एक मजबूत संघटना तयार होईल. गावातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

मी माझी भूमिका बिनधास्त मांडतो
२०१९ ची निवडणूक भाजपा-शिवसेना महायुतीच्या माध्यमातून लढली गेली. मी बारामतीतून उभा राहिलो. माझा मतदारसंघ खानापूर होता. तरीही आम्ही एकमेकांना मदत केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीपासून ठरले होते. परंतु निकाल आल्यानंतर शिवसेनेच्या लक्षात आले आपण वेगळं गणित मांडू शकतो. भाजपासोबत विश्वासघात केला. अडीच वर्ष राज्याला विकासापासून वंचित राहावे लागले. राजकारणात शेरास सव्वा शेर राहावे लागते. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे वगळून एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणली. अजित पवारांनीही नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असे म्हटले आहे. त्यामुळे मी नाराज असल्याचा विषय नाही. मी बिनधास्त माझी भूमिका मांडतो. माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असे पडळकरांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR