नागपूर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून राज्यात गुंडांचा मुक्त संचार सुरू आहे.
घोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले आहे. तसेच हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता जे नेहमी पुढे पुढे करतात, ती व्यक्ती महिला की पुरुष हे लवकरच कळेल. त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकरांच्या रूपाने गेला, असे वडेट्टीवार म्हणाले. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.
घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता आहे. पुढे होणा-या चौकशीत त्यांचे नाव समोर येईल. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. यामागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता असून चौकशीपूर्वी मी त्याचे नाव घेणे योग्य नाही. मात्र हे नाव लवकरच सर्वांपुढे असेल, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.