अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.
जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच २१ बीएफ ९२४८) मध्ये ५ जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त कंटेनर ट्रेलर (क्रमांक एमएच ४६ एएफ ९८३३)ला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये स्विफ्ट कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला. दरम्यान, कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असल्याचे कळते. ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके आणि वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.