चाळीसगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार करण्यात आला.
या पाठोपाठ जळगावात तीन दिवसांपूर्वी अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
बाळू मोरे ऊर्फ महेंद्र मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढ-या रंगाच्या कारमधून पाच अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बाळू मोरे यांच्यावर गोळीबार केला. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर ८ गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले.
पूर्ववैमनस्यातून मोरे यांच्यावर हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकाराची दृश्यं सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.
हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागली होती. त्यानंतर यांना उपचारासाठी तात्काळ नाशिक येथील अशोका रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. दरम्यान या हल्ल्यावेळी मोरे यांना वाचविण्यासाठी गेलेले अजय बैसाणे याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.