लातूर : वाढदिवस असल्याने आपल्या पित्यासोबत केक घेऊन घराकडे जाणा-या दुचाकीला भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात पाठीमागे केक घेऊन बसलेली मुलगी अन्नू (वय १३) रोडवर फेकली गेली. दरम्यान, ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने जागीच ठार झाली. हा अपघात बारानंबर पाटी रेल्वे गेटनजीक घडला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, जवानाराम मंगळराम जाट (वय ४६ मु. हानुद्वारा पो. सोनाहिया ता. फुलोरा जि. जयपूर, राजस्थान) हे लातुरातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन (एम.एच. २४ ए.सी. ९६४४) मुलीला घेऊन लातूर शहरात केक आणण्यासाठी आले होते. ते केक घेऊन घराकडे निघाले असता, बारानंबर पाटी रेल्वेगेटनजीक समोरुन आलेल्या भरधाव दुचाकीने (एम.एच. २४ बी.क्यू. २३५९) त्यांच्या दुचाकीला जारोची धडक दिली. यावेळी पाठीमागे बसलेली मुलगी रस्त्यावर फेकली गेली. ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली (एम.एच. २४ बी.एल. २१७७) आल्याने जागीच ठार झाली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुचाकी चालक वसीम उस्मान शेख (वय २३ रा. भोईसमुद्रगा ता. जि. लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाढदिवसादिवशीच अन्नूला मृत्यूने गाठले
अन्नूचा वाढदिवस असल्याने पिता जवानाराम जाट हे आपल्या मुलीला घेवून केक आणण्यासाठी दुचाकीवरुन लातुरात आले होते. दरम्यान, केक घेवून ते परत घराकडे जाताना सीआरपीएफ कॅम्पनजीक दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अन्नूला वाढदिवसादिवशीच मृत्यू गाठले. हृदय पिळवटून टाकणा-या या घटनेने मात्र अनेकांच्या मनाला चटका लावला आहे.
पाच मिनिटांच्या अंतरावरच होते घर
वाढदिवस असल्याने पित्यासोबत दुचाकीवर हातात केकचा बॉक्स घेऊन पाठीमागे बसलेल्या अन्नूचा समोरुन आलेल्या भरधाव दुचाकीने घात केला. अचनाकपणे जोराने धडक दिल्याने बेसावध असलेली अन्नू रस्त्यावर फेकली गेली. डाव्या बाजूने जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आल्याने ती ठार झाली. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर घर होते, मात्र काळाने तिच्यावर असा घाला घतला.