पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.
आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काहीच महिन्यांपूर्वी ड्रग्जमाफिया ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यानंतर ड्रग्जचे मोठे रॅकेट समोर आले होते. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला एक्स-रेसाठी नेत असताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. त्यानंतर तो ससूनमध्ये उपचार घेत असताना देशात ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे समोर आले होते. ससून रुग्णालयातील त्याचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर ससून रुग्णालयातील प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
मात्र त्यानंतर आता शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला पकडणे हे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती. मात्र आता त्याने पळ काढल्याने पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.