पुणे : सुनेत्रा पवार यांना विजयी करावे, अशा आशयाचा आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेला फलक का-हाटी गावात एका शेती फार्मच्या मालकाने लावला होता. त्या फलकावर शाईफेक करण्यात आली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत ही शाईफेक झाल्याचे रविवारी सकाळी समोर आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी २ जुलै २०२३ रोजी दोन गट पडले.
अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला दिलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरू आहेत. बारामती तालुक्यातील का-हाटी येथे उभारण्यात आलेल्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना घडली आहे.
शाईफेकीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावक-यांंनी संबंधित फलक उतरवला आहे.
का-हाटीतील एका शेती फार्मच्या मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात असून, त्यापैकी एका फ्लेक्सवर का-हाटी गावात शाई फेकल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.