परभणी : लुप्त होत चाललेल्या लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव परभणी शहरात सुरू आहे. महोत्सवाच्या ४थ्या दिवसाची सुरवात मानवत तालुक्यातील लोहरा गावच्या जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शिवरायांची आरती करून केली. त्यानंतर या शालेय विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या ठिकाणी असलेल्या शस्त्र प्रदर्शनीला भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिवराज डापकर, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी प्रमुख अतिथी डॉ. गणेश चंदनशिवे, स्मृती आणि ऐश्वर्या बडदे यांच्यासह परभणीचे भूमिपुत्र व ७ पुरस्कार प्राप्त लोक कलाकार गणेश नागभिडे यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.
महासंस्कृती महोत्सवाचा ४था दिवसाचे चर्चासत्र तमाशा कलावंत ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या प्रगल्भ विचार व गीतांनी गाजवले. परभणी विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, परभणीला लोक कलाकारांची मोठी परंपरा आहे. स्व. राजाराम बापू गोंधळी यांनी पॅरिस येथे गोंधळ सादर केले असता तिथल्या राजांनी याला ९ वे आश्चर्य म्हणून उल्लेख केल्याची तसेच लोककलेतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार परभणी जिल्ह्याला मिळाल्याची त्यांनी आठवण करून दिली. चर्चा सत्रादरम्यान त्यांनी लोककला ही आपल्या राज्याच्या संस्कृतीच दर्शन घडवते आणि आम्ही संस्कृती जपणारी लोक आहोत असे सांगितले. यादरम्यान त्यांनी गणेशवंदना, गोविंदा रे गोपाळा, नभातूनी आली अप्सरा ही बाजीराव मस्तानी मधील टाकणी, जनाबाईच गान, या या शेजारणीन बर नाही केलं ग बया, माझी मैना गावावर राहिली, माज्या जीवाची होतीया काहीली गात त्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
स्मृती आणि ऐश्वर्या बडदे यांच्या लावणी नृत्याविष्काराने परभणीकरांची मने जिंकली
उत्तरार्धात माधुरी बडदे यांची संकल्पना व निर्मिती असलेल्या व सिनेअभिनेत्री स्मृती, ऐश्वर्या बडदे व २० सहकलाकारांच्या संचाने कुटुंबासह पहावा असा घरंदाज लावणीचा नृत्याविष्कार लावण्यरंग हा बहारदार लावण्याचा कार्यक्रम महासंस्कृती महोत्सवात सादर केला.यावेळी परभणीकर प्रेक्षकांनी अनेक लोकप्रिय लावण्याना वन्स मोरच्या घोषणा व टाळ्या-शिटीसह मोठ्या प्रमाणावर दाद दिली.